सांगली - लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर गावाकडे जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना वेळेत रोखा, अन्यथा औद्योगिक क्षेत्राला घरघर लागेल. अशी मागणी सांगलीच्या उद्योजकांनी राज्य सरकारकडे केली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाडच्या उद्योजकांनी संयुक्तिक पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे.
सांगली महापालिका क्षेत्र आणि आसपास 1200 छोटे-मोठे उद्योग आहेत. यामध्ये सुमारे 12 हजाराहून अधिक परप्रांतीय कामगार गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. लॉकडाऊनमुळे आता परप्रांतीय मजूर आणि कामगार यांना सरकारकडून त्यांच्या गावी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने कोरोनाच्या भीतीमुळे परप्रांतीय कामगार परतत आहेत. मात्र, त्यांच्या या स्थलांतराचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.
सांगली मिरज आणि कुपवाडसह आसपास असणाऱ्या एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. त्यामुळे हे कामगार परतले, तर कारखाने बंद पडतील, अशी भीती उद्योजकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या गावी परतणाऱ्या परप्रांतीय कामगारांना रोखण्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात अन्यथा जिल्ह्यातले उद्योगधंदे पूर्ण संपुष्टात येतील आणि यामुळे सांगली जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राचे 2 हजार कोटींचे नुकसान होईल, असे सांगलीच्या उद्योजकांचे मत आहे.