सांगली - तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची थकीत बिले सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल. त्याचबरोबर एकाही शेतकऱ्यांचे पैसे बुडणार नाहीत, असा विश्वास खासदार संजयकाका पाटील यांनी दिला आहे. थकीत बिलांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.
पैसे द्या, अन्यथा आंदोलन..
तासगाव आणि विट्याच्या नागेवाडी साखर कारखान्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांची उसाची बिलं दिलेली नाहीत. या थकीत बिलाच्या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून खासदार संजय काका पाटील यांच्या मालकीच्या कारखान्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर संजय काका पाटील यांनी शुक्रवारपर्यंत पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तरीही पैसे जमा झाले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर आरोप करत घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्याचा एकही पैसा बुडवणार नाही..
त्या पार्श्वभूमीवर खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन तासगाव आणि नागेवाडी या दोन साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चार अधिक पैसे मिळतील, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तसेच या दोन्ही कारखान्यांच्या माध्यमातून उपपदार्थ बनवण्याचे प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. केंद्राकडूनही याला मान्यता मिळाली आहे, हे प्रकल्प उभारण्यासाठी केलेली गुंतवणूक यामुळे शेतकऱ्यांची बिलं देण्यास विलंब झाला. त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो. शेतकऱ्यांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत बुडणार नाहीत, लवकरच या दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचा प्रयत्न राहणार,असल्याचे संजयकाका पाटील म्हणाले.