सांगली - जिल्ह्यातील दुष्काळी भागाला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यामुळे नदी,नाले आणि ओढे तुडूंब भरून वाहू लागले आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसाचा सांगली जिल्ह्यात धुमाकूळ सुरू आहे. शनिवारी पावसाने जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे ओढे-नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. तर दुष्काळी भागातून वाहणाऱ्या अग्रणी नदीला कित्येक वर्षांनंतर पूर आला आहे.
खानापूर तालुक्यातील काही भागातून वाहणारी ही अग्रणी नदी पुढे तासगाव तालुक्यातून वाहते. खानापूर भागाबरोबरच तासगाव तालुक्यातील सावळज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव हद्दीत अग्रणी नदी तुडूंब भरून वाहू लागली आहे. काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर जाण्याची वेळ आली आहे.
अग्रणी पात्रातील सावळज- बिरणवाडी व मळणगाव - योगेवाडी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. याशिवाय गावांना जोडणारे ओढे आणि छोटे पूल अद्यापही पाण्याखालीच आहेत. शेतातील नाले-तुडूंब भरून वाहत असून परतीच्या पावसाने दुष्काळी भागातील चित्र पालटले आहे.