सांगली - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. परदेशातून नुकतेच सांगलीमध्ये परतलेल्या काही प्रवाशांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा मेसेज सध्या सांगलीच्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या पत्राचे दाखले देऊन हा मेसेज फिरत असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, शासकीय रुग्णालयाने या सर्व प्रकरणाचा खुलासा करत, ही अफवा असून नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
जगभर सध्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या रोगाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांबाबतीत मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येत आहे. नुकत्याच परदेशातून सांगली जिल्ह्यातील 17 प्रवासी परतले आहेत. या प्रवाशांच्या प्रकृतीची खबरदारी घेण्याबाबत एक पत्र सांगली जिल्हा शासकीय रुग्णालयाला राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून पाठवण्यात आले होते. संबंधित शासकीय रुग्णालय आणि आरोग्य विभागाच्यावतीने प्रवाशांच्या प्रकृतीची काळजी घेण्यात येत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयाला प्राप्त झालेलं हे पत्र काही प्रवासी पालिका क्षेत्रातील असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाला पाठवण्यात आले होते. मात्र, पाठवलेले पत्र, परदेशातून परतलेल्या प्रवाशांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या चुकीच्या संदेशाखाली व्हायरल झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. सोशल मीडियावर असलेल्या व्हायरल मेसेजमुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. अखेर शासकीय रुग्णालयाकडून त्या पत्र आणि संदेशाबाबत खुलासा करण्यात आला आहे.
पत्रात उल्लेखलेल्या व्यक्ती हे रुग्ण नाहीत, त्यांना कोरोनाची लागण झाली नाही. त्यांची विमानतळावर राज्य शासनाच्या प्राधिकृत वैद्यकीय पथकाकडून रितसर तपासणी करण्यात आली आहे. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याची खातरजमा झालेली आहे. त्यामुळे त्यांना पाठवण्यात आले आहे, पण तरीही या प्रवाशांवर नजर आणि त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याच्या सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. त्या पद्धतीने काम सुरू आहे. मात्र, त्या पत्राचा चुकीचा विपर्यास काढून ते पत्र व्हायरल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिले आहे. तसेच हे पत्र कोणी व्हायरल केले, याचा शोध घेऊन संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही साळुंखे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -
आधारमुळं खरंच मिळाला 'आधार'; ४ वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा सापडला