सांगली - जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सिनेअभिनेते स्वप्नील जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रातील दहा व्यक्तींना यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. सामाजिक, सांस्कृतिक, प्रशासकीय आणि आरोग्य सेवेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट अभिनेता म्हणून स्वप्निल जोशी, तर सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त स्मृती पाटील यांना प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरवण्यात आले.
हेही वाचा - ...तर बँक फोडणार! नवनीत राणा अधिकाऱ्यांवर संतापल्या
वृत्तवाहिनी क्षेत्रातील उत्कृष्ट निवेदिकेचा पुरस्कार न्यूज १८ लोकमतच्या रेश्मा साळुंखे यांना देण्यात आला. यासह सांगली जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टरांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याने जयंत पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली. 'घड्याळ आमच्याच पक्षाचे चिन्ह असल्याने वेळेवर आमचाच कंट्रोल आहे' असे पाटील बोलताच सभागृहात एकच हशा पिकला.
हेही वाचा - 'कुछ तो लोग कहेंगे'... अदनान सामींचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर
कलाकार आणि पत्रकारांचे नाते हे नवरा-बायको सारखे असते. तुझे माझे जमेना आणि तुझ्या विना पटेना, अशी स्थिती आहे. चित्रपटाच्या रिव्ह्यूवेळी आम्हाला भीती असते, पत्रकारांना हा चित्रपट आवडेल की नाही? पत्रकारांना तो पटेल की नाही? पण मी खूप भाग्यवान आहे. मला नेहमीच माध्यमांचे प्रेम मिळाले आणि आज याच माध्यमाचा पुरस्कार विष्णूदास भावे यांच्या भूमीत मिळतोय, याचा अभिमान असल्याचे मत स्वप्निल जोशी यांनी यावेळी व्यक्त केले. या पुरस्कार सोहळ्याला सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शेखर जोशी यांच्यासह मान्यवर मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.