सांगली - रमजान ईदच्या निमित्ताने सांगलीच्या मिरजेत गरजूंना वाटप करण्यासाठी तब्बल ५ हजार लिटर शिरखुरमा बनवण्यात आला होता. सोशल डिस्टन्स पाळत हायत फाऊंडेशनकडून मुस्लीम तसेच हिंदू बांधवांना खीरचे वाटप करण्यात आले. ईदच्या शुभेच्छा देत रमजान ईद साजरी करण्यात आली. सांगलीच्या मिरजेत कोरोना पार्श्वभूमीवर रमजान ईद साजरी होत आहे.
लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या अनेक गरजूंना मिरजेतील हायत फाऊंडेशनकडून लॉकडाऊनपासून जीवनावश्यक कीट, दररोज फूड पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे. पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने फाऊंडेशनकडून शहरातील गोरगरीब मुस्लीम बांधवांसह हिंदू बांधवांना ईदच्या निमित्ताने शिरखुरमा वाटपाचे आयोजन आज ईदच्या दिवशी करण्यात आले होते. यासाठी फाऊंडेशनकडून तब्बल ५ हजार लिटर शिरखुरमा बनवण्यात आला होता.
सोशल डिस्टन्स आणि कोरोनाची खबरदारी घेऊन प्लास्टिक डब्यात खीर पॅकिंग करून वाटप करण्यात आली. अनेक मुस्लिम बांधवांना आज कोरोनाच्या परिस्थितीमुळे आपल्या घरी शिरखुरमा बनवणे अर्थिकदृष्ट्या अवघड होते. त्यामुळे आपल्या इतर समाजातील बांधवांना खीर देणे यंदा शक्य नव्हते. या सर्वांचा विचार करून हायत फाऊंडेशने ईद साजरी करण्याबरोबर त्याचा आनंद घेता यावा या उद्देशाने ५ हजार लिटर खीर वाटपाचे आयोजन केले होते.