सांगली : सांगलीमध्ये खळबळ उडवून देणारी घटना भरदिवसा घडली आहे. सांगली मिरज रोडवर असणाऱ्या रिलायन्स ज्वेलरी शॉपवर रविवारी धाडसी दरोडा पडला. दुपारी 3.30 च्या सुमारास सात ते आठ जणांनी पोलीस असल्याची बतावणी करून रिलायन्स ज्वेलरी शॉपमध्ये प्रवेश केला. यानंतर दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत शॉपमध्ये असणाऱ्या कर्मचारी आणि ग्राहकांच्या तोंडावर चिकटपट्टी लावून, बंधक बनवले. यावेळी विरोध करणारया ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण देखील करण्यात आली. त्यानंतर दुकानात असणारे सोन्याचे दागिने बागेत भरून पसार झाले.
दरोडेखोरांनी गोळीबार केला : यावेळी एका ग्राहकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी गोळीबार केला, ज्यामध्ये दुकानातील काच फुटली. यावेळी गोळीबारात ग्राहक वाचला पण फुटलेल्या काचावर पडून जखमी झाला. दरोडा टाकून जाताना दरोडेखोरांनी दुकानात असणारे सीसीटीव्हीची डिव्हीआर मशीन देखील लंपास केली. यावेळी पळून जाताना एक
डिव्हीआर पडून फुटल्याने तो तिथेचे टाकून दरोडेखोरांनी पळ काढला, दोन गाड्यातून हे दरोडेखोर आल्याचे समोर आले आहे.
नागरिकांची मोठी गर्दी : घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तसेच पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्यासह अधिकाऱ्यांना घटनास्थळी तातडीने धाव घेतली. तसेच या दरोड्याची बातमी पसरताच रिलायन्स ज्वेलर्स समोर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरोडेखोरांच्या शोधासाठी तातडीने पोलिसांची पथके रवाना झाली आहेत, तर जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे.
सोन्याचे दागिने लुटले : या दरोडयात सुमारे 14 कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लूटण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र भरदिवसा शहरातल्या मध्यवर्ती असणाऱ्या वर्दळीच्या ठिकाणी पडलेल्या धाडसी सिनेस्टाईल दरोड्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या दरोड्यातील काही आरोपी व गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाडीचे सीसीटिव्ह फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोरांनी मिरजेच्या दिशेने पळ काढल्याचे समोर आले आहे, तसेच हे दरोडेखोर परराज्यातील असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा :