सांगली - उत्तर प्रदेशमधील हाथरस बलात्कार प्रकरणी सांगलीमध्ये आज दलित महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अर्धनग्न होऊन बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवत, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा दहन करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
हाथरस या ठिकाणी घडलेल्या एका सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचे संतप्त पडसाद देशभर उमटत आहेत. सांगलीमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. दलित महासंघाच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे. शहरातील गांधी पुतळ्यासमोर दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कपडे काढून अर्धनग्न होऊन बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवला. योगी सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासन या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री योगी यांनी राजीनामा द्यावा. तसेच या बलात्कार प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा - केंद्राचा कृषी, कामगार कायदा म्हणजे लोकशाही मारण्याचे पाप; राज्यमंत्री विश्वजीत कदमांची टीका
दरम्यान, संतप्त दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा दहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी आंदोलकांच्याकडून पुतळा हिसकावून घेत पुतळा दहन हाणून पाडले. दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.