सांगली - अज्ञात वाहनाच्या धडकेत एक मगर ठार झाली आहे. सांगली इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मीफाटा याठिकाणी ही घटना घडली आहे. महापुरानंतर या भागातील सखल भागात साचलेल्या पाण्यात या मगरीचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे.
अपघातात मगर ठार
सांगली शहरापासून कसबे डिग्रजनजीक असणाऱ्या सांगली-इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मी फाटा या ठिकाणी सकाळच्या सुमारास रस्त्यावर एक मगर मृतावस्थेत आढळून आली आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत मगरीचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावर आल्यानंतर मगरीच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने ही मगर जागीच ठार झाली आहे. या घटनेनंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर वन विभागाकडून ही मृत मगर ताब्यात घेण्यात आली.
कृष्णेच्या पात्रातून विस्थापित झालेली मगर
2019मध्ये कृष्णा नदीला महापूर आला होता, त्यानंतर कृष्णानदीत वास्तव्य असणाऱ्या मगरी या विखुरल्या होत्या. त्यापैकी ही एक मगर लक्ष्मी फाटा याठिकाणी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सखल भागात साचलेल्या पाण्यात वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. ही मगर डबक्यातून रस्त्यावर आली असता हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.