सांगली - मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचा भ्रमनिरास झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फाजील आत्मविश्वासालाही तडा गेला आहे, अशी टीका भाजपाचे आमदार व प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पंढरपूरच्या मंगळवेढा पोटनिवडणूकीतील भाजपा उमेदवाराच्या विजयानंतर सांगलीमध्ये ते बोलत होते.
फडणवीस यांनी पडळकरांचे केले अभिनंदन -
पंढरपूरच्या मंगळवेढा विधानसभेच्या पोट निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार दिवंगत भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचा भाजपा उमेदवार समाधान अवताडे यांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे या विजयानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे फोनवरून अभिनंदन केले आहे.
महाविकास आघाडीचा भ्रम निरास -
या निवडणुकीमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीने आपला उमेदवार विजयी होईल, असा दावा केला होता. मात्र, त्यांचा भ्रम निरास झाला. गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडीकडून केवळ भ्रष्ट कारभार केल्यामुळे जनतेने आघाडीच्या उमेदवाराला नाकारला आणि भाजपच्या उमेदवाराला विजयी केले आहे.
पवारांच्या फाजील आत्मविश्वासाला तडा -
उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान पाच दिवस तळ ठोकून होते. गल्लीत जाऊन त्यांनी प्रचार केला. अगदी घरोघरी जाऊन चहा पिण्यापासून पोहे खाल्ले. मात्र, त्यांची असणारी भाषा आणि आपलाच उमेदवार निवडून येणार या फाजील आत्मविश्वासाला जनतेने तडा दिला असल्याची टीकाही आमदार पडळकर यांनी केली.
हेही वाचा - 'आम्हाला 2 हजार 280 मतदारांची साथ; गोकुळ व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या हातात जाईल'