इस्लामपूर ( सांगली ) - सांगलीच्या इस्लामपूर येथील सौदी अरेबियातून परतलेल्या चौघांना कोरोना लागण झाली आणि बघता बघता त्या चौघांच्यामुळे त्याच कुटुंबातील 26 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे संपूर्ण प्रशासन आणि राज्य हादरून गेले. इस्लामपूरची तुलना थेट इटली, भारतातील भिलवडा बरोबर होऊ लागली. मग संपूर्ण राज्याची यंत्रणा स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी रस्त्यावर उतरले. मात्र, यामध्ये मुख्य भूमिका बजावली इस्लामपूर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने.
इस्लामपूर शहर हे सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी एक प्रकारे मुंबईच आहे. तीन तालुक्यातील नागरिकांना जीवनावश्यक अशा सर्व गोष्टी इस्लामपूरमध्येच मिळत असल्याने लोक जिल्ह्याच्या ठिकाणी न जाता इस्लामपूरला येत असल्याने इस्लामपूर येथील बाजारपेठा अगदी गजबजून गेलेल्या असायच्या. परंतु, कोरोनाचे पहिले चार रुग्ण सापडले आणि संपूर्ण इस्लामपूर शांत झाले. आज हे शहर एका निर्जन स्थळासारखे वाटू लागले आहे. सौदी अरेबिया येथून उमराहा देवदर्शन यात्रा करून 14 फेब्रुवारीला एक कुटुंबीय इस्लामपूर शहरात परतले आणि होम क्वारंटाईनच्या सूचना असताना या कुटुंबाने त्याचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 26 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने प्रशासन चक्रावून गेले होते. कारण 24 जणांचा त्यांच्या आसपासच्या आणि इतर लोकांचाही मोठ्या प्रमाणात संपर्क आल्याचा समोर आलं होतं. त्यांना शोधने, त्यांच्यापासून इतरांना कोणाचा संसर्ग होणार नाही, हेच मोठं आव्हान प्रशासनासमोर होतं. मग या सर्व गोष्टींवर इस्लामपूर नगरपालिका प्रशासन जिल्ह्याचा आरोग्य प्रशासन पोलीस प्रशासन सर्वांनी मिळून यावर खडक पावलं उचलायला सुरुवात केली.
महाराष्ट्रातला हे पहिलेच शहर होते, ज्या कुटुंबातले पंचवीस जण कोरोना बाधित झाले होते. त्यांच्या संपर्कात जवळपास 400 हून अधिक लोक आल्याचं समोर आलं होतं. या सर्वांना शोधणे आणि त्यांच्यापासून इतरांना कोणाला संसर्ग होऊ न देणे व कोरोनाचा पादुर्भाव टाळणं अशक्य होतं. मात्र, पालिका आणि पोलीस प्रशासनाने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे.
प्रांत अधिकारी नागेश पाटील , तहसीलदार रवींद्र सबनीस, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, नगरपालिका मुख्याधिकारी प्रज्ञा पवार, शिवसेनेचे अशोक पवार, गटविकास अधिकारी शिशिकांत शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पी आय नारायण देशमुख या जाबाज टीमने एकामागून एक कडक उपयोजना सुरू केल्या. असा झाला, इस्लामपुरचा "कोरोना लॉक डाऊन".
२५ वर आकडा पोहचल्यावर पहिल्यांदा संपूर्ण तीन दिवस कडकडीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला,ज्या मध्ये अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आल्या. ज्या भागात कोरोना बाधित कुटुंब राहते, तो संपूर्ण एरिया ३ किलोमीटर पर्यंत सीलबंद करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या संपर्कात कोण, कोण आले, याची यादी तयार करण्यात आली. एक टास्क फोर्स लावून शहर आणि जिल्ह्यात शोध घेण्यात आला. ज्यामध्ये त्या कुटुंबाच्या संपर्कात तब्बल 493 लोक आल्याचे समोर आले. त्यातही 33 जण हे जवळच्या संपर्कात आल्याचे समोर आले. त्यानंतर प्रशासनाने जवळच्या संपर्कात आलेल्या 33 जणांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले व 493 लोकांना होम क्वारंटाईन केले.
होम क्वारंटाईन करणाऱ्या सर्वांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू या नगरसेवकांच्या माध्यमातून घरपोच करण्यात आल्या. नगरपालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात सोडियम क्लोरोफाईडने निर्जंतुकीकरण तसेच जंतू नाशकाची औषध फवारणी करण्यात आली. इतर नागरिकांची घरगुती किंवा अतिआवश्यक वस्तूंसाठी गैरसोय होऊ नये म्हणून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी नवीन योजना आखून प्रत्येकाच्या घरोघरी पाले-भाज्या, दूध यासारख्या दैनंदिन लागणाऱ्या वस्तू पोहचवल्याने नागरिकांना घरातून बाहेर पडणे बंद झाले. तर जवळपास 25 मार्च नंतर इस्लामपूर शहरामध्ये कोणालाही येऊ दिले नाही किंवा इस्लामपूर शहरातून बाहेर जाऊ दिलं नाही. इतकेच नव्हे तर ज्या एरियामध्ये कोरोना बाधित कुटुंब होतं तिथल्याही नागरिकांना त्यांच्या सीमेच्या बाहेर जाऊ दिले नाही. पोलीस प्रशासनाचा एक खडा पहारा इस्लामपूर शहरात जागोजागी पाहायला मिळाला. इस्लामपूर शहर पोलीस उपाधीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डोळ्यात तेल घालून तिथले पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत होते आणि या सर्वांचा परिपाक असा की, परदेशातून आलेला हा कोरोना एका कुटुंबापुरताच मर्यादित राहिला. तो इस्लामपूर शहरातल्या कोणत्याही अन्य नागरिकाला झाला नाही किंवा तो तिथल्या प्रशासनाने होऊ दिला नाही.
परिणामी इस्लामपूर शहर कोरोना मुक्तकडे वाटचाली बरोबर संसर्गाच्या विळख्यातून सही सलामत सुटताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे इस्लामपूर नगरपालिका, आरोग्य प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने बजावलेली भूमिक, ही राज्यातील "कोरोना मुक्तीचा, इस्लामपूर पॅटर्न" म्हणून निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.