सांगली - मिरज तालुक्यातील टाकळी येथे कोरोना तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याचा प्रकार घडला होता. तसेच साहित्यांची तोडफोडही केली होती. या प्रकरणी एका तरुणासह महिलेला मिरज न्यायालयाने चांगलीच अद्दल घडवली आहे. जामीन मंजूर करण्यासाठी 3 महिने आठवड्यातील दोन दिवस कोरोना केंद्रावर सेवा बजावण्याची अट घातली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांवर झाला होता हल्ला -
कोरोनामुळे आरोग्य विभागावर मोठा ताण आला आहे. आरोग्य सेवा बजावताना आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नुकतेच मिरज तालुक्यातल्या टाकळी याठिकाणी कोरोना तपासणीसाठी गेलेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांवर 6 जून रोजी गावातल्या एका कुटुंबाकडून हुज्जत घातली होती. तसेच साहित्यांचीही तोडफोड केल्याची घटना घडली होती. त्या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
जामीन पाहिजे, मग कोरोना सेंटरवर सेवा द्या -
दरम्यान, या घटनेनंतर आरोग्यसेविका असणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने हल्लेखोर आकाश यादव या तरुणासह महिलेविरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. तर मिरज ग्रामीण पोलिसांनी आकाश यादवसह महिलेला अटक केली होती. गुरुवारी त्यांना जामिनासाठी न्यायालयात हजर केले होते. मात्र, मिरज न्यायालयाने सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत, जामीन मंजूर करण्यासाठी शिक्षा सुनावली आहे. तरुणाला व महिलेला आरोग्य सेवेची जाणीव व्हावी, या उद्देशाने अद्दल घडावी यासाठी चक्क कोरोना सेंटरवर आठवड्यातील 2 दिवस असे 3 महिने सेवा बजावण्याची अट घालत जामीन मंजूर केला आहे.