सांगली - गेल्या ६० वर्षांत काँग्रेसने केवळ मुस्लीम समाजाचा मतांच्या राजकारणासाठी वापर केला आहे. मात्र, आता मुस्लीम समाज काँग्रेसच्या मतांच्या राजकारणाला बळी पडणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेण्याचा निर्धार सांगलीमध्ये पार पडलेल्या स्वाभिमानी मुस्लीम समाज संघटनेच्या मेळाव्यात करण्यात आला आहे.
मुस्लीम समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व राजकीय विकासासाठी सांगलीमध्ये स्वाभिमानी मुस्लीम समाज संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या मुस्लीम समाजातल्या तरुणांनी एकत्र येऊन या संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचा पहिला जिल्हा मेळावा सांगली शहरात पार पडला. त्यासाठी सांगली जिल्ह्यातून बहुसंख्य मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष तोसिफ मुन्शी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मेळाव्यात मुस्लीम समाजाच्या बाबतीत काँग्रेस पक्षाने गेल्या ६० वर्षात घेतलेल्या भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. काँग्रेसने केवळ मुस्लीम समाजाचा मतांच्या राजकारणासाठी वापर करत, नेहमीच मुस्लीम समाजाला भीतीच्या छायेत ठेवण्याचा उद्योग केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यापुढे काँग्रेसच्या मतांच्या राजकारणाला बळी न पडता सक्षम पर्याय उभरण्याचा निर्धार केला. प्रसंगी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णयही या मेळाव्यात घेण्यात आला.