सांगली - राज्यासह सांगली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच रब्बी हंगामातील पेरणीसाठी मोफत बियाणे देण्याची मागणीही करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
हेही वाचा... ओळख पटत नसल्याने मृतदेह शवागारात पडून
अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाले आहे. सुमारे 65 हजार हेक्टर शेती अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहे. या आधी महापुरामुळे कृष्णा आणि वारणा काठची शेती मोठ्या प्रमाणात वाया गेली. त्यानंतर परतीच्या पावसाने जिल्ह्यातल्या शेतीचे अतोनात नुकसान झाले. द्राक्षबागांचे सर्वाधिक नुकसान जिल्ह्यात झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतीचे नुकसान पाहता राज्यासह, सांगली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा... खासदार इम्तियाज जलील हरवले... सामान्य नागरिकाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. परतीच्या पावसामुळे शेतीचे न भरून निघणारे नुकसान झाले असून, अजून पंचनामे सुरू आहेत. प्रत्येक शेतकऱ्याचे नुकसान वेगवेगळ्या पद्धतीचे आहे. मात्र सरकार सर्वांना एकाच पातळीवर मदत करण्याची भूमिका घेत आहे. मात्र सरसकट शेतकऱ्यांना एकाच तराजूत तोलने शेतकऱ्यांवर अन्याय करणारे ठरेल. त्यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. त्याचबरोबर आगामी रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. याप्रसंगी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, स्वाभिमानीचे नेते महावीर पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.