सांगली - बिबट्याच्या हल्ल्यात 1 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील तळवडे येथे घडली आहे. सुफीयान शमशुद्दीन शेख वय 1 वर्ष असे या बालकाचे नाव आहे. या बालकाचे पालक शमशुद्दीन निजामुद्दीन शेख ( वय 27, मूळगाव आनंदगाव ता. माजलगाव जि. बीड ) हे कुटुंबासह ऊसतोडणीसाठी तळवडे येथे आले आहेत. दरम्यान ऊस तोडत असताना या बालकाला झाडाखाली सावलीत ठेवले होते, याचवेळी बिबट्याने हल्ला केला.
दरम्यान घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शमशुद्दीन निजामुद्दीन शेख हे आपल्या कुटुंबासह ऊस तोडणीसाठी तळवडेमध्ये आले आहेत. रोजच्याप्रमाणे त्यांनी आपल्या मुलाला एका झाडाच्या सावलीमध्ये ठेवले, या बालकासोबत त्यांची नातेवाईक असलेली एक सात वर्षांची मुलगी देखील होती. ही मुलगी पाणी पीण्यासाठी गेली असता, उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने या बालकावर हल्ला केला. त्याची मान पकडून बिबट्याने त्याला उसात नेले, दरम्यान ही घटना लक्षात आल्यानंतर या मुलीने आरडाओरड केली, मुलीचा आवाज ऐकून सर्व जण आल्याने बिबट्याने या बालकाला उसात टाकून पळ काढला, त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
15 लाखांची मदत जाहीर
या घटनेनंतर आमदार मानसिंगराव नाईक आणि उपवनसंरक्षक प्रमोद धानके यांनी या कुटुंबाची भेट घेत सात्वन केले, या कुटुंबाला वनविभागाच्या वतीने 15 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून, त्यातील 5 लाख रु. ही तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर 10 लाख रु. हे मुदत ठेव स्वरुपात या कुटुंबाला देण्यात येणार आहेत.