सांगली - पावसाचे आगर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चांदोली धरणक्षेत्रात अद्याप पावसाने म्हणावा तसा जोर धरलेला नाही. सध्या धरण क्षेत्रात पावसाची रिमझीम सुरु आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे.
दरवर्षी जुन, जुलै महिन्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असतो. जुलै महिन्याच्या या दिवसांत वारणा नदीस पूर येतो. यावर्षी मात्र जुलै महीना निम्मा उलटून गेला तरी म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे बारमाही तुडुंब भरुन वाहणाऱ्या वारणा नदीचे पाञ सध्या कोरडे पडले असल्याचे चित्र आहे. सध्या धरण क्षेत्रात पावसाची रिमझीम सुरु असल्याने धरणात आज सकाळी २२.95 टिएमसी एवढा पाणीसाठा झाला असून धरण ६५ टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात धरणक्षेत्रात १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणाच्या पायथा गेटमधून सध्या ११०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू आहे.