सांगली - देशासाठी वीरमरण आलेल्या जवानांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी '52 सेकंद शहीदांसाठी' हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये हुतात्मा जवानाच्या घरासमोर ध्वजारोहण करत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
देशात आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. सगळीकडे या निमित्ताने ध्वजारोहण सोहळा पार पडला. मात्र, सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील विठूरायची वाडी येथे हृदयस्पर्शी ध्वजारोहण सोहळा पार पडला. देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा जवानांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी '52 सेकंद शहीदांसाठी' हा उपक्रम राबवण्यात आला. राष्ट्रगीत हे 52 सेकंदाचे असून तेवढा वेळ हुतात्मा जवानांच्या सन्मानार्थ त्यांच्या दारात जाऊन प्रजासत्ताक दिन करण्यात आला.
विठूरायची वाडी येथील हुतात्मा जवान राहुल करांडे यांच्या घरासमोर ध्वजारोहण सोहळा पार पडला. हुतात्मा जवान राहुल करांडे यांच्या मातोश्रींच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.
रोहित पाटील यांनी आपल्या मित्रांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवला असून पुढील काळात अशाच पद्धतीने जिल्ह्यातील हुतात्म्यांच्या कुटुंबांच्या घरासमोर प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा मानसही रोहित पाटील यांनी व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा उपक्रम राबवण्यात आल्याचे रोहित पाटील यांनी यावेळी सांगितले.