जत (सांगली) - जत तालुक्यातील मुचंडी येथे तीस रुपये मागितल्याच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत छातीवर गंभीर जखम करून एका तरुणाचा मित्रानेच खून केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अरुण शामू मलमे (वय 20 वर्षे) ,असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मुचंडी (तोळबळवाडी) कन्नड शाळेजवळ मंगळवारी (दि. 18 मे) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतची मृताचे वडील शामू गुंडा मलमे (वय 58 वर्षे) यांनी जत पोलिसांत तक्रार दिली आहे.
या प्रकरणी आरोपी रमेश फकीराप्पा पाटोळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश पाटोळे फरार असून पोलीस शोध घेत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस निरीक्षक रत्नाकर नवले, सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले, सहायक पोलीस निरीक्षक महेश मोहिते आदींनी भेट दिली. आरोपीच्या शोधासाठी तीन पथके वेगवेगळ्या भागात रवाना केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुचंडीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तोळबळवाडी येथे अरुण मलमे व रमेश पाटोळे हे दोघे मित्र राहत होते. मंगळवारी (दि. 18 मे) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संशयित रमेश हा अरुणला तीस रुपये देण्यासाठी गेला. यावेळी दोघांचे भांडणे झाले. यावेळी रमेशने अरुणचा गळा धरून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारून ढकलून दिले व खाली पडल्यावर रमेशने छतीवर बसून अरुणला जखमी केले. यात अरुणचा मृत्यू झाला.
घटनास्थळावरून रमेशने पळ काढला आहे. घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले करत आहेत. आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - खत दरवाढीशी केंद्राचा संबंध नाही, पण लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल - सदाभाऊ खोत