सांगली - जिल्ह्यातील शिराळा येथील सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक लि. शिराळा या बँकेच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यात वाळवा आणि शिराळा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अनेकांचा समावेश आहे.
आतापर्यंत शिराळा शाखेतून 250 लोकांना बोगस कर्जाच्या नोटीस पाठवल्या आहेत. वैशाली बाबासो संकपाळ, सुजाता संजय मगदूम, सविता राजेंद्र मगदूम, सारिका अनिल मालगावे, सुनीता अजित मालगावे, रेखा सुरेश मालगावे या सर्व महिला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथील रहिवासी आहेत. येथून शंभर किलोमीटर दूर राहणाऱ्या या महिल्यांच्या नावानेही 3 लाखांचे कर्ज घेतल्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकारामुळे कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकारानंतर सर्व महिलांनी छत्रपती शासन संघटनेच्या अध्यक्षा दिव्या मगदूम यांची भेट घेतली. तसेच आम्ही कर्ज घेतले नसताना आम्हाला नोटीसा आल्या आहेत. यामुळे घरात वाद होत असल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, हा प्रकार कथन केला. यानंतर शनिवारी दिव्या मगदूम आणि त्यांच्या पथकाने शिराळा येथील सर्जेराव नाईक बँकेत भेट दिली.
यावेळी ज्या महिलांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत, त्यांचे कर्जाची मूळ कागदपत्रे आणि बॉण्ड काढून पाहिले असता, या महिलांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्डच्या प्रती आणि खोट्या सह्या आढळून आल्या. तर ते कागदपत्रांवरील फोटो हे पाच वर्षांआधीचे आहेत, असेही दिसून आले. ही कागदपत्रे बँकेला कोणी दिले, याचे नाव जाहीर करावे आणि सर्वसामान्य महिलांना बँकेने विनातारण 3 लाखपर्यंत कर्ज कोणत्या आधारावर दिले? असे प्रश्न दिव्या यांनी अधिकाऱ्यांना केले. तसेच आजपर्यंत या बँकेचे नावही कधी ऐकले नाही किंवा आमचा कोणत्याही प्रकारे या बँकेशी संबंध आला नसल्याचे या महिलांनी सांगितले. यामुळे तसेच या गरीब महिलांची फसवणूक कोणी केली, त्यांच्यावर कर्जाची रक्कम कोणी टाकली, हे माहित होत नाही तोपर्यंत बँकेतून हलणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.
अखेर बँकेवर नेमलेले प्रशासकीय अधिकारी आदिनाथ दगडे यांनी दिव्या मगदूम यांना फोन करून आम्ही महिलांसाठीच काम करत आहोत. संबंधितावर कारवाई चालू आहे म्हणून सहकार्य करण्याची विनंती केली. तर आठवड्यात यातील खरा सूत्रधार कोण आहे, याची माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा या बँकेची एकही शाखा सुरू करू देणार नसल्याचा दम दिव्या मगदूम यांनी दिला. दरम्यान, यावेळी उपस्थित कर्मचारी, पदाधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती.
बँकेबाबत -
शिराळा येथील सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक लि. शिराळा या बँकेची स्थापना 1997 साली झाली. बँकेच्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात 13 शाखा आहेत. बँकेच्या सर्व संचालकांनी राजीनामा दिला असल्याने सध्या बँकेवर प्रशासक (डीडीआर) आदिनाथ दगडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यातील दलित महिलांना बोगस कर्जाच्या नोटीस मिळाल्याने बँके विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. वाळवा तालुका रिपब्लिकन पार्टीच्यावतीने इस्लामपूर पोलिसांत ही तक्रार दाखल करण्यात आली.
संचालकांनी केलेला गैरव्यवहार दडपण्यासाठीच हा प्रकार करण्यात आला. त्यात एखाद्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला गाठून त्याच्यामार्फत महिलांना फसवून कागदपत्रे गोळा करण्यात आली, गरीब महिलांच्या नावे 31 मार्च 2018 ला कर्ज दाखवले असावे, अशी शक्यता व्यक्त होत आहे.