सांगली - प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलन उग्र झाल्याचे दिसून आले. आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेत ठिकठिकाणी जमाव पांगवणाऱ्या पोलिसांवरही हल्ला केला. या प्रकारावरून भाजप नेत्यांनी टीका केली आहे. आपण केलेला हिंसाचार लपवण्यासाठी आता नवनवीन कहाण्या रचल्या जातील, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधाकांवर केली. सर्व जगाने दिल्लीतील हिंसाचार पाहिला, असेही पाटील म्हणाले. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते.
हिंसेवर विश्वास असणारे लोक दिल्लीच्या आंदोलनात रस्त्यावर
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपवर करण्यात आलेल्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला. संपूर्ण जगाने दिल्लीतील हिंसाचार पाहिला आहे, शेतकऱ्यांच्या नावाखाली हिंसेवर विश्वास असणारे लोक दिल्लीच्या आंदोलनात रस्त्यावर उतरले आणि हिंसाचार झाला. आता हा आपण केलेला हिंसाचार लपवण्यासाठी नव-नवीन कहाण्या निर्माण होतील, पण जगाने टीव्हीच्या माध्यमातून हा हिंसाचार पहिला आहे. सर्वांनी याची निंदा केली आहे. तसेच भाजपचा याच्याशी कसलाही संबंध नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनीही मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यावर हे नेते आता तोंड मिटून बसलेत, असे शेलार म्हणाले.
हेही वाचा - आता तुमची तोंडे का शिवली? शरद पवार आणि राऊतांवर आशिष शेलारांची टीका