सागंली - देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून नवनवे फंडे उपयोगात आणले जात आहेत. अशीच एक शक्कल भाजपच्या नेत्याने लढवली आहे. सांगलीतील एका जाहीर सभेत भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी जास्त मताधिक्य देणाऱ्या आमदार किंवा नेत्याला १० लाख किंवा सोन्याचे कडे देण्याची मागणी महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडे केली आहे.
जास्त मताधिक्य देणारा आमदार, नेता आणि तालुक्याला १० लाख किंवा सोन्याचे कडे देण्याची मागणी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी या जाहीर सभेत केली. सांगली लोकसभेसाठी भाजपकडून खासदार संजयकाका पाटील निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचाराचा धडाका सध्या भाजपकडून सुरू आहे. या प्रचारादरम्यान भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी खासदार पाटील यांना अधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी एक नवा फंडा आणला आहे.
ज्या मतदारसंघाचे आमदार, तालुक्यातील नेत्यांकडून संजयकाका पाटील यांना अधिक मतदान देईल. त्यांना दहा लाख रुपये किंवा सोन्याचा कडा देण्यात येईल, असा प्रस्ताव सभेत मांडण्यात येत आहे. औदुंबर याठिकाणी पार पडलेल्या प्रचार समारंभाच्या सभेत पृथ्वीराज देशमुख यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नेते, आमदार यांना खूष करण्याचा हा फंडा मांडला. सभेमध्ये चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबतची मागणी पृथ्वीराज देशमुख यांनी केली आहे.