सांगली - राष्ट्रवादी पक्ष स्थापन होऊन 30 वर्षे झाली. मात्र, आजपर्यंत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करता आला नाही. ( NCP Chief Sharad Pawar ) पावसात भिजूनसुद्धा फक्त ५४ इतकेच आमदार निवडून आले, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( Bjp Mla Gopichand Padalkar ) यांनी केली. पुणे येथे नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi Pune Visit ) यांच्या कार्यक्रमाला आमंत्रण नसल्यानं शरद पवारांनी व्यक्त केलेल्या खंतवरून आमदार पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. ते सांगलीच्या झरे येथे बोलत होते.
प्रस्थापितांचा तीळपापड होतोय -
आमदार पडळकर म्हणाले, "शरदचंद्र पवार यांचे कालचे भाषण ऐकून मी अवाक झालो. कारण एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात आणि दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात. त्यांना पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे किंबहुना सन्माननीय पवार साहेब हताशपणे बोलले असतील. आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवरती यांचा राग यामुळेच आहे, माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते असो, यांना देवेंद्रजींनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणले. त्यामुळेच प्रस्थापितांचा तीळपापड होतोय. म्हणूनच आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्रजी यांच्या नजरेत खुपतात."
हेही वाचा - ...तर मग गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलांचीही चौकशी करा -प्रवीण दरेकर
30 वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करू शकले नाही -
तसेच मी पवार साहेबांना सांगू इच्छितो की, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात भाजपाचे १०५ आमदार तर शिवसेनेचे ५६ अशे एकूण १६१ आमदार महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना पुन्हा आणण्याकरताच निवडून दिले होते. मात्र, आपल्या नेतृत्त्वात पावसात भिजूनही फक्त ५४ इतकेच आमदार निवडून आले. त्यामुळे जनतेने तुम्हालाच निवडून दिले, अशा खोट्या थापा मारू नका. आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही, पण तुमच्या पक्ष स्थापनेपासून गेल्या तीस वर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रावादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती भूमिका घेणं सोपं असतं. मात्र, लोकहितासाठी सक्षम भूमिका घेणं कठीण असतं, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.