सांगली - मुंबईतील 'राजगृह' तोडफोड प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. आज सांगलीमध्ये भीमसेनेच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन राजगृह तोडफोडीबाबत निदर्शने केली. तोडफोड करणाऱ्या समाज कंटकांवर कडक कारवाई करावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
सांगली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भीमसेनेच्या नेतृत्वाखाली राजगृहाच्या तोडफोडीचा निषेध नोंदवण्यात आला. हल्ला करणाऱ्या समाज कंटकांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखलकरून त्यांना कडक शिक्षा करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या 'राजगृह' या ठिकाणी मंगळवारी संध्याकाळी अज्ञातांनी तोडफोड केली. राजगृहाच्या आवारात असलेला सीसीटीव्ही कॅमेरा आणि झाडांच्या कुंड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राजगृह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. त्याआधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.