जत (सांगली) - व्हसपेठ येथील हनुमान स्टीलस् अँड सर्व्हिसेसमधील राजस्थानी व्यापाऱ्यास चौघा अज्ञातांनी जबर मारहाण केली. त्यांच्याकडील दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि मोबाईल असा लाखाचा मुद्देमाल लंपास केला. शनिवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. मूळ राजस्थानातील असलेले हिराराम बालाजी चौधरी (रा. व्हसपेठ) असे मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
हिराराम चौधरी यांच्या मालकीचे व्हसपेठ हद्दीत माडग्याळ रस्त्यावर हनुमान स्टील नावाचे दुकान आहे. सायंकाळी सहा वाजता चौधरी हे दुकानात असताना काही अज्ञात चोरटे तेथे आले, त्यांनी अचानक चौधरी यांच्यावर लोखंडी रॉडने वार करण्यास सुरुवात केली. प्रसंगावधान राखून चौधरी यांनी राँड तसाच धरून ठेवला. तर दुसऱ्याने शेजारील फरशी त्यांच्या डोक्यात घातली. यात चौधरी हे जखमी झाले. दुकानातील दोघे नोकर त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावले असता त्यांनाही जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळवून लावले. या प्रकारानंतर चौघेही घटनास्थळावरून फरार झाले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात दहशत मजली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - सांगली शहरातील क्वारंटाइन सेंटरमधून दोन कोरोनाबाधित कैद्यांचे पलायन