सांगली - नजीकच्या पाच गावांसह शहराला महापुराच्या एका नव्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. आतापर्यंत अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरचा फटका शहराला बसत होता. मात्र, आता सांगली नजीक निर्माण होणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गामुळे बॅकवॉटरचा धोका निर्माण होणार आहे. जवळपास चार किलोमीटर पर्यंत रस्त्याची उंची सात फुटांपासून 13 पर्यंत वाढविण्यात येत असल्याने सांगलीकरांसमोर एक नवा धोका निर्माण झाला आहे.
अलमट्टीचा प्रश्न सुटला, पण नवा निर्माण होतोय..
सांगली शहराला आणि त्याच्या नजीक असणाऱ्या गावांना कृष्णा व वारणा नदीला महापूर आल्यानंतर अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरचा फटका आतापर्यंत बसल्याचा समोर आला आहे. 2005 आणि 2019 नंतर वारंवार महापुराचा धोका होण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे नुकतेच महाराष्ट्र सरकारकडून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या सोबत बैठक घेऊन अलमट्टी धरणातून पावसाळ्यात योग्य विसर्ग ठेवण्याबाबत विनंती केली आहे. त्याचे नियोजनही सुरू आहे. एका बाजूला राज्य सरकारकडून अलमट्टी धरणामुळे निर्माण होणाऱ्या बॅकवॉटरचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न होत असताना दुसऱ्या बाजूला सांगली शहराला मात्र आता एका नव्या बॅक वॉटरचा समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
रस्त्याची उंची 7 ते 13 फुटांनी वाढली..!
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग मुळे हा धोका निर्माण होणार आहे. सांगली शहराच्या नजीक असणाऱ्या अंकली ते मिरज दरम्यान करण्यात येत असलेल्या रस्त्यासाठी जवळपास 7 ते 13 पर्यंत पर्यंत वाढविण्यात आली आहे.
रस्त्यासाठी एक प्रकारे हा बांध घालण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पात्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला पुन्हा कृष्णा नदी पात्रात जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे याठिकाणी पाण्याचा प्रवाह थांबणार आहे, परिणामी हे पाणी इनाम धामणी सह सांगली शहराच्या विस्तारीत भागात पोहचणार आहे.
पात्रा बाहेरचे पाणी पुन्हा पात्रात जाण्यास अडथळा!
सांगली शहराला महापुराचा धोका निर्माण होतो. त्यानंतर शहरात कृष्णा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरते. त्याच बरोबर हरिपूर या ठिकाणाहून वारणा आणि कृष्णानदीचे पाणी पात्रा बाहेर पडते. मात्र दोन्ही नद्यांचे पाणी पुन्हा अंकली ते मिरज मार्गावरुन पलीकडे असणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात पोहोचते. आता नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी रस्ता निर्माण करताना ज्या पद्धतीने रस्त्याची उंची वाढवण्यासाठी घालण्यात आलेले भराव आणि उभारलेल्या सिमेंटच्या भिंती यामुळे सांगली शहरातून येणारे पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर थांबणार आहे. त्यामुळे एक प्रकारचा बॅक वॉटर प्रश्न निर्माण होऊन ते पाणी इनाम धामणी बरोबर शहराच्या विस्तारित भागात मोठ्या प्रमाणात घुसणार आहे.
रस्त्यासाठी फ्लाय ओव्हर निर्माण करा..
रस्त्याच्या उंचीच्या विरोधात इनाम धामणी, अंकली, निलजी बामणी यासह आसपासच्या गावांनी विरोध दर्शवत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. अंकली ते मिरज 4 किलोमीटर दरम्यान फ्लाय ओव्हर निर्माण करावा, अशी मागणी करत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारही देण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहणी करत ग्रामस्थांच्या बरोबर चर्चा देखील केली. तसेच पाण्याचा प्रवाह रस्त्याच्या पलिकडे जाण्यासाठी तीन ठिकाणी पाईपलाईन करण्यात आल्याचं स्पष्ट करत ग्रामस्थांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आहे.
नव्या समस्याला द्यावे लागणार तोंड..
एका बाजूला राज्य सरकार सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरचा बसणारा फटका थोपवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करत असताना नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या उंचीमुळे भविष्यातील एक नव्या बॅकवॉटरचा प्रश्न सांगलीकरांसाठी निर्माण होणार आहे.