सांगली - विधानपरिषदेच्या मोहापायी राजू शेट्टी हे पिंजरा चित्रपटातल्या तमाशातल्या फडावर गेलेल्या शिक्षकांप्रमाणे अडते आणि व्यापाऱ्यांची दलाली करत असल्याची टीका भाजपचे नेते व माजी मंत्री आशिष शेलार यांनी केली. ते सांगलीच्या येडेमच्छिंद्रगड याठिकाणी किसान आत्मनिर्भर यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
नव्या कृषी कायद्याला पाठिंबा देण्याकरता रयत क्रांती संघटना आणि भाजपकडून 'किसान आत्मनिर्भर यात्रा' आयोजित करण्यात आली आहे. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या येडेमच्छिंद्र येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मगावातून या यात्रेचा शुभारंभ झाला आहे. भाजपचे नेते माजी मंत्री अशिष शेलार यांच्या हस्ते या यात्रेचे उद्घाटन झाले. यावेळी भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह रयत क्रांती आणि भाजप पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यामधून भाजप नेत्यांनी कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर सडकून टीका केली आहे.
हेही वाचा-केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहाणी... चार महिन्यांनंतर 'सरकारी बाबू' बांधावर
काँग्रेसने शेतकऱ्यांना लुटण्याचे केले काम-
सदाभाऊ खोत म्हणाले, की देशातून गोरे गेले आणि काळे इंग्रज आले. त्यांनी शेतकऱ्यांना लुटण्याचे काम केले. नेहरू यांनी औद्योगिक क्रांती होण्यासाठी शेतकऱ्यांचा माल कमी किमतीत घेण्याचे धोरण सुरू केले. त्यामुळे शेतात पिकणारा शेतकऱ्यांचा माल स्वस्तात रेशनिंगवर आला. त्यामुळे शेतकऱ्यांना तुडवण्याचे काम काँग्रेसने केले. राहुल गांधी आता विचारतात बिल कसे आणले? त्यांनी त्यांच्या बाप दाद्यांनी काय केले ते बघावे, अशी सडकून टीका खोत यांनी केली.
![आत्मनिर्भर यात्रेचा शुभारंभ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sng-01-kisan-yatra-byt-7203751_24122020144235_2412f_1608801155_713.jpg)
हेही वाचा-राहुल गांधींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; केंद्राने कृषी कायदे मागे घ्यावे...
अदानी-अंबानींना शेतात गांजा पिकविण्याला परवानगी मिळाल्यावर येतील...
अदाणी आणि अंबानी हे शेतामध्ये येऊन शेती करणार आणि शेतकऱ्यांची शेती काढून घेणार, असा प्रचार करण्यात येत आहे. मात्र, अदानी अंबानी फक्त पिकवलेला माल फक्त विकत घेणार आहेत. पण, अदानी अंबानी शेती पिकवायला येणार असे सांगत आहेत. पण सरकार ज्यावेळी शेतात गांजा पिकवायला परवानगी देईल, त्यावेळी अदानी-आंबानी शेतात शेती पिकवायला येतील, अशी टीका खोत यांनी राजू शेट्टींचे नाव न घेता केली आहे.
जाणता नव्हे तर विश्वासघात राजा म्हणून लिहले जाईल...
सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले, की पवार साहेबांचे मनावर घेऊ नये. पवार साहेब जे बोलतात त्याचे उलट करतात. ज्यावेळी सूर्य पूर्वेला उगवेल असे ते सांगतात. त्यावेळी तो पश्चिमेला उगवलेला असतो. त्याचबरोबर पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये बाजार समित्या बंद झाल्या पाहिजेत असे लिहले आहे. तेच आता कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. पण पवार यांनी खरं बोलावे. कारण महाराष्ट्राचा इतिहास लिहला जाईल, त्यावेळी पवारांना शेतकऱ्यांचा जाणता राजा नव्हे तर शेतकऱ्यांचे विश्वासघात राजा होता,असे लिहले जाईल, अशी खोचक टीका खोत यांनी केली आहे.
दुकान चालविण्याचे काम सुरू...
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, मेंढ्याचे नेतृत्व लांडग्यांने केल्याप्रमाणे दिल्लीतील शेतकऱ्यांचे नेतृत्व सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी जे शेतकरी हिताचे बिल आणले, त्याला विरोध करण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र शेतीमालाचा जास्तीत जास्त हमीभाव मोदी सरकारच्या काळात वाढला आहे. अनेक ठिकाणी युरियाचा काळाबाजार सुरू होता. तो मोदी सरकारने बंद केला आहे. मोदी सरकारने घेतलेले निर्णय शेतकरी हिताचे आहेत. तसेच शेतकरी नेते शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे मोदींच्या कृषी कायद्याला समर्थन दिले आहे. असे असले तरी तर अन्य कोणी आपले दुकान चालवण्याचे काम करू नये, असा टोला पडळकर यांनी राजू शेट्टी यांना लगावला आहे. तसेच भारतीय जनता पक्ष वारसदारासाठी काम करत नाही, अशी टीका त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या घराणेशाहीवर केली आहे.
हे तर शाहू महाराजांनी निर्माण केलेले कायदे...
माजी मंत्री आशिष शेलार म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केलेले बाजारपेठेचे कायदे नरेंद्र मोदी पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत. शरद जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे होत असेल तर विरोध करणाऱ्यांच्या पोटात का दुखायला लागले आहे. आडत भाव ठरवेल,असे यापुढे होणार नाही. आता कंपन्या आणि व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या दारात येऊन भाव ठरवणार आहेत. तर याला विरोध कशासाठी ? असा सवालही यावेळी शेलार यांनी केला आहे.
विधानपरिषदेच्या मोहापायी दलालांची वकिली..
राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना शेलार म्हणाले की,अदानी व अंबानीच्या दारात जाऊन मुंबईत तुम्हाला आंदोलन करायची वेळ कशासाठी येते. मात्र, शेतकऱ्यांना आम्ही सांगतो आम्ही काठ्या घेऊन मुंबईत उभे आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला धक्का लागू देणार नाही,हे लक्षात ठेवावे.
शेतकऱ्यांचे दिल्लीत २८ दिवसांपासून आंदोलन-
कृषी कायद्याच्या निषेधार्थ गेल्या २८ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ४० शेतकरी संघटनांना पत्र लिहिले आहे. सरकारने शेतकरी संघटनांना पुढच्या फेरीच्या चर्चेसाठी वेळ व तारीख निश्चित करण्यास सांगितले आहे.