सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी मानाच्या पादुका पंढरपूरमध्ये घेऊन जाण्यासाठी विमान, हेलिकॉप्टरचा वापर करण्याचा आणि सोबतच शासकीय महापूजा करायची की नाही? हा निर्णय सुद्धा लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच, रामदेव बाबांच्या कोरोना औषधांना आयुष्य मंत्रालयाच्या परवानगी शिवाय राज्यात विक्री होऊ देणार नसल्याचे गृहमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
गृहमंत्री अनिल देशमुखांची पत्रकार परिषद राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत आज (रविवारी) सांगलीत कोरोनास्थितीबाबत जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा, आमदार विक्रम सावंत यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढाव घेत, सर्व पातळ्यांवर योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार पुर्ण ताकदीने कोरोनाशी सामना करत आहे. सध्या आषाढी वारी सुरू आहे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालख्या घेऊन जाण्याबाबत सर्व काळजी घेण्यात येत आहे. सोबतच आषाढीच्या दिवशी मानाच्या ९ पालख्या पंढरीत दाखल होण्याबाबत प्रस्थान करण्याचे चोख नियोजन करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय मानाच्या पादुका विमान किंवा हेलिकॉप्टरमधून हवामानाचा अंदाज घेऊन पंढरपुरात पाठवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यानी यावेळी दिली आहे. दरम्यान, यंदा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा करायची की नाही, याचासुद्धा निर्णय घेण्यात येणार असून सरकारकडून विठ्ठलाला देशातील आणि राज्याला कोरोनामुक्त करण्याचे साकडे घालणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील क्राईम रेट कमी झाले आहे. मात्र, सायबर गुन्ह्यात लॉकडाऊनच्या काळात वाढ झाली असल्याची माहिती गृहमंत्री देशमुखांनी दिली. मागील सरकारच्या काळात गृहमंत्र्यांचा जिल्हा क्राईम कॅपिटल म्हणून देशात ओळखला जायचा, मात्र त्याच जिल्ह्याचा गृहमंत्री असून हे सरकार ती ओळखा पुसून काढेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
सध्या रामदेबाबा यांनी तयार केलेले औषध कोरोनावरील प्रभावी औषधा असल्याचे भासवले जात आहे. मात्र, हे औषध रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे असल्याचे दिसून येते आहे. तसेच या औषधाला केंद्रीय आयुष्य मंत्रालयाने अद्याप कोरोनावर उपचार करणारे औषधे असल्याची एनओसी दिली नाही. त्यामुळे राज्यात या औषधाला सरकारकडून परवानगी मिळणार नाही. तसेच राज्यात कोणीही औषधाची विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील गृहमंत्र्यांनी या वेळी दिला.