सांगली - जिल्ह्यातील ब्रम्हनाळ 'बोट दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करू' असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर पूरात मदतकार्य करणाऱ्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सांगलीच्या ब्रह्मनाळमध्ये महापुरात बोट उलटून दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 17 निष्पापांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर पूरात मदतकार्य करणाऱ्या गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पूरपरिस्थितीमध्ये मदत करणाऱ्या गावकऱ्यांशी ई टिव्ही भारत चे प्रतिनिधींनी चर्चा केली, असता येथील ग्रामस्थांनी हा संताप व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी प्रशासनावर कारवाई करावी. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ही घटना घडली. गावकऱ्यांनी पूरात अडकलेल्यांना मदत केली, यात गावकऱ्यांचा काय दोष आहे, असा सवाल गावकऱ्यांनी केला आहे. गावकऱ्यांनी मदत केली नसती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. ही घटना घडत असताना प्रशासन कोठे होते? याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. प्रशासन जर वेळेवर पोहोचले असते तर ही दुर्घटनाच घडली नसती. परंतू पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रशासन 4 दिवसांनंतर आले. मग मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करावी आणि प्रशासनावर कारवाई करावी, असेही गावकऱ्यांनी म्हटले आहे.