सांगली - जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर हा 10 टक्क्याच्या खाली आल्याने जिल्ह्याचा समावेश हा तिसऱ्या स्तरामध्ये झाला आहे. यामुळे आता 14 जून पासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेबरोबर सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत आता सर्व दुकाने उघडी असणार आहेत. त्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे.
शासन निर्णयात शिथिलता
सांगलीत सर्व दुकानांना परवानगी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर 5 एप्रिल पासून सांगली जिल्ह्यात कडक निर्बंध लागू होते. मात्र कोरोना पॉझिटिव्हीटी दर कमी येत असल्याने 1 जून पासून यामध्ये शिथिलता मिळाली होती. तर उपलब्ध ऑक्सिजन बेड आणि पॉझिटिव्हिटी दर यावरून राज्य शासनाकडून अनलॉक करण्याबाबत नियमावली ठरवण्यात आली आहे. ज्या मध्ये 5 स्तर निर्माण करण्यात आले असून, त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून शिथिलता देण्यात येत आहे.
सर्व दुकानांना मिळाली परवानगीगेल्या आठवड्यात सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 17 टक्क्यावर आल्याने अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 11 अशी दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली होती. त्यानंतर कमी होणारी रुग्णसंख्या यामुळे वेळेची मर्यादा सायंकाळी 4 पर्यंत करण्यात आली होती. मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांना अद्याप परवानगी नव्हती. पण आता जिल्ह्याच्या पॉझिटिव्ह दर 10 टक्क्यांच्या खाली आल्याने शासन निर्णया नुसार तिसऱ्या स्तरामध्ये जिल्ह्याचा समावेश झाला आहे. यामुळे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले असून आता अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरीक्त असणाऱ्या दुकानांना उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. परंतू शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी चौधरी यांनी जाहिर केले आहेत. त्यामुळे आता सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा- Unlock Impact : जालन्यात अनलॉक होताच रस्त्यांवर उसळली गर्दी; कोरोना नियमांचाही विसर