सांगली - महापालिकेने लागू केलेल्या 'उपयोगकर्ता कर'विरोधात आज (गुरुवार) आंदोलन करण्यात आले आहे. उपयोगकर्ता हटाव या सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने बिलांची होळी करत निषेध नोंदवण्यात आला आहे.
सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातल्या सर्व नागरिक, व्यापारी, हातगाडी फेरीवाले असे सर्वांना पालिका प्रशासनाने उपयोगकर्ता कर लागू केला आहे. या अतिरिक्त कराची बिले सर्वांना पाठवण्यात येत आहेत. मात्र, या नव्या उपयोगकर्ता कराला सांगलीच्या विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी एकत्र येऊन विरोध दर्शवला आहे. याविरोधात लढण्यासाठी उपयोगकर्ता हटाव सर्व पक्षीय कृती समिती स्थापन करण्यात आली. आधीच घरपट्टीच्या बिलातून स्वच्छता कर वसूल करण्यात येतो, मात्र घनकचरा प्रकल्पाच्या नावे उपयोगकर्ता कर लादण्याचा हा घाट असून या कराच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला वार्षिक 600 रुपये तर व्यापारी, उद्योजक, हातगाडीवाले यांना दुप्पट, चारपट कर लादण्यात येणार आहे.
त्यामुळे सांगलीकर नागरिकांवर अन्याय करणारा हा कर असल्याचा आरोप करत आज पालिकेत याविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. हा कर रद्द करण्याच्या मागणीसाठी पालिका कार्यालयासमोर उपयोगकर्ता कर बिलांची होळी करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना यासह सांगलीच्या सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता.
हेही वाचा -
थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; हे राज्य अग्रसेर
चंदा कोचर यांना उच्च न्यायालयाचा दणका, बडतर्फी विरोधातील याचिका फेटाळली