सांगली - कत्तलखाना आणि कचरा डेपो हटाव या मागणीसाठी आज मिरज तालुक्यातील ग्रामस्थांनी सांगली महापालिकेसमोर आंदोलन केले. पालिकेविरोधात निदर्शने करत नियोजित हाडांच्या गोदामाला विरोध करण्यात आला आहे.
मिरज शहराबाहेर बेडग रस्त्यावरील वड्डी नजीकच महापालिकेच्या कचरा डेपो आणि कत्तलखान्याचा वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. कचरा डेपो आणि कत्तलखान्यामुळे आसपासच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याबाबत अनेक वेळा पालिकेला निवेदन देऊन हा कचरा डेपो आणि कत्तलखाना बंद करावा, अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. तर यातच आता पालिकेने या कचरा डेपोच्या ठिकाणी हाडांचे गोदाम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आसपासचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून सांगली महापालिकेविरोधात आंदोलन केले आहे.
हेही वाचा - बंधनकारक परवाना शुल्क विरोधात सांगलीत धरणे
महापालिकेच्या आज पार पडणाऱ्या महासभेच्या पार्श्वभूमीवर बेडग, वड्डी ,लिंगणूर आदी आसपासच्या ग्रामस्थांनी एकत्र येत सांगली महापालिका कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. कचरा डेपोमुळे आधीच ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले, त्यामध्ये पुन्हा त्याठिकाणी हाडांचे गोदाम करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी ग्रामस्थांना भयंकर रोगांना सामोरे जावे लागणार असल्याने पालिकेने याठिकाणी असणारे कचरा डेपो, कत्तलखाना हटावची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
हेही वाचा - सांगलीत तिहेरी हत्याकांड.. मुलानेच केला आई-वडिलांसह बहिणीचा खून