सांगली - पुणे व औरंगाबाद शहरांच्या नामांतराचे विषय चर्चेत असताना जिल्ह्यात रात्रीतच मिरजच्या रेल्वे स्टेशनचे नामकरण करण्यात आले आहे. मातंग समाज बांधवांनी रात्री अचानक येऊन रेल्वे स्टेशनला लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे हे नामकरण केले आहे. सकाळी हा सर्व प्रकारे समोर आला आहे.
मिरज शहरातील मिरज रेल्वे जंक्शनला लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी मातंग समाजाकडून करण्यात येत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप मातंग समाज बांधवांनी केला. त्यामुळे संतापलेल्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी थेट मिरज जंक्शनचा बोर्ड बदलून साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे रेल्वे जंक्शन मिरज असा बोर्ड लावला. स्टेशनच्या कार्यालयावर चढून मातंग समाजातील आंदोलकांनी हा बोर्ड लावला आहे.
हेही वाचा-औरंगाबादेत रेल्वे स्थानकाच्या फलकांना पोलीस बंदोबस्त
नामांतराचा मुद्दा राज्यात ऐरणीवर...
राज्यात सध्या विविध शहरांच्या नामांतराचा प्रश्न गाजत आहे. काही दिवसांपूर्वी लिंगायत समाजाकडून मिरज रेल्वे जंक्शनला जगद्गुरू महात्मा बसवेश्वर, असे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मातंग समाजाकडून थेट आंदोलनाची भूमिका घेत मिरज जंक्शनला अण्णाभाऊ साठे यांचे नाव दिले आहे. मात्र, सकाळी हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर मिरज रेल्वे पोलिसांनी अण्णाभाऊ साठे नावाचा फलक जप्त केला आहे.
हेही वाचा-उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याची मनसेची मागणी