सांगली - पलूस तालुक्यातील नागठाणे-अंकलखोप मार्गावर पुरग्रस्त पाहणी दौऱ्यादरम्यान कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात झाला आहे. ताफ्यातील पोलिसांची पायलट गाडी रस्त्याच्याकडेला पलटी झाल्याने चालक आणि कर्मचारी असे दोनजण गंभीर जखमी झाले असून त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ताफ्यातील पायलट गाडी पलटी -
मंगळवारी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आपल्या मतदारसंघातील पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे पूर परिस्थितीची पाहणीसाठी निघाले होते. यावेळी अचानकपणे नागठाणे-अंकलखोप मार्गावर एक दुचाकीस्वार आडवा आला. त्याला वाचविण्यासाठी ताफ्यातील पायलट गाडीच्या चालकाने प्रयत्न केला, त्यामुळे वाहनाचा ताबा सुटून पायलट गाडी रस्त्याच्या पलीकडे जाऊन पलटी झाली. या अपघातात गाडीचे चालक व एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहेत. या दोन्ही जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातात कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम हे सुखरूप आहेत.