सांगली - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या घोटाळ्याप्रकरणी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे सांगली अध्यक्ष सुनील फराटे यांनी पत्र पाठवून बँकेच्या घोटाळ्याची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - सांगलीत एमआयएमला धक्का; जिल्हाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश
जिल्हा बँकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने थेट पंतप्रधानांकडे चौकशीची मागणी करण्याचा हा प्रकार आहे. तर, राज्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून, यामुळे सांगली जिल्हा बँकेच्या पारदर्शक कारभाराची धिंडवडे उडाले आहेत.
घोटाळ्याबाबत थेट पंतप्रधानांकडे तक्रार
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरती, कर्ज वसुली, कर्जवाटप थकीत कर्ज, संगणक वाटप आदी बाबींमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी नाबार्डकडे चौकशीची मागणी केली होती. याची दखल घेऊन नाबार्डकडून पुणे सहकार आयुक्तांना याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानंतर पुणे सहकार विभागाने कोल्हापूर सहकार विभागाच्या निबंधकांकडे बँकेच्या चौकशीची जबाबदारी सोपवली. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय सत्ता आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपचे संचालक मंडळ सत्तेत आहे. त्यामुळे, या चौकशीवर फराटे यांनी प्रश्न उपस्थित करत, त्यामधून काहीच निष्पन्न होणार नसल्याने त्यांनी याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून बँकेतील घोटाळ्याची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट पंतप्रधानांकडे तक्रार
पंतप्रधानांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पंतप्रधान आणि रिझर्व बँकेकडून तक्रारीची दखल घेतली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट पंतप्रधानांकडे घोटाळ्याच्या चौकशीबाबत तक्रार केल्यामुळे राज्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर पारदर्शी कारभार, असा टेंभा मिरवणाऱ्या मध्यवर्ती बँकेच्या पारदर्शी कारभाराचे धिंडवडे उडाले आहेत.
हेही वाचा - भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठान संघटनेत उभी फूट? कार्यवाहक चौगुले निलंबित