सांगली - सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी (District Bank Election) काल चुरशीने मतदान पार पडले. 85.31 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. महाविकास आघाडीच्या सहकार पॅनल विरुद्ध भाजपाच्या शेतकरी विकास पॅनेलमध्ये लढत झाली. 18 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी 23 नोव्हेंबरला पार पडणार असून जिल्हा बँकेमध्ये कोणाचे वर्चस्व राहणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मतदान चुरशीने, कोणाचा उडणार धुव्वा?
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रणित सहकार विकास पॅनल आणि भाजपाचे शेतकरी विकास पॅनल रिंगणात आहे. महाविकास आघाडी पॅनेलचे तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे उर्वरित गटातील 18 जागांसाठी काल मतदान पार पडले. महाविकास आघाडी आघाडी विरुद्ध भाजपा अशी काट्याची लढत या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाली. अत्यंत चुरशीने पार पडलेल्या या मतदानामध्ये 85.31 टक्के मतदान झाले आहे. जवळपास 2573 पैकी 2195 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दोन्ही पॅनलकडून विजयाचे दावे करण्यात आलेले आहेत. मात्र 23 नोव्हेंबर रोजी जिल्हा बँकेत कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. 21 पैकी 3 जागा याआधीच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, शिवसेनेचे खानापूरचे आमदार अनिल बाबर आणि काँग्रेसच्या कदम गटाचे महेंद्रसिंह लाड हे बिनविरोध झाले आहेत.