सांगली - जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील येळापूर येथे चोरीची घटना घडली. मुख्य रस्त्यालगत रमेश महादेव स्वामी यांचा बंगला फोडून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. यात रोख रक्कम व दागिने असे एकून साडेचार लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. कोकरूड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. भरदिवसा चोरी झाल्याने परिसरात घबराट पसरली.
कराड-शेडगेवाडी राज्य मार्गावर येळापूर गावच्या उत्तरेस रमेश स्वामी यांचा बंगला आहे. या बंगल्यात ते पत्नी व दोन मुलासह राहतात. रमेश हे कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. तर त्यांची पत्नी घरातील कामे आवरून गावातील त्यांच्या दिराच्या घरी गेल्या होत्या. त्यांची दोन्ही मुले परगावी शिक्षणासाठी आहेत. याचा फायदा घेत चोट्यांनी स्वामी यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कपाटात असणारे पन्नास ग्रामचे गंठन, वीस ग्रामची चैन, वीस ग्रामच्या दोन अंगठ्या तसेच ७० हजार रुपयेची रोख रक्कम, असे साडे चार लाखचा ऐवज लंपास केला.
रमेश स्वामी यांच्या पत्नी सायंकाळी सहाच्या सुमारास घरी आल्या. त्यावेळी त्यांना चोरी झाल्याचे समजले. घटनेची नोंद कोकरुड पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. शिराळा परिसरात 15 दिवसात चोरीची ही नववी घटना असून, पोलीस काय करत आहेत? असा सवाल नागरीक करत आहेत.