इस्लामपूर (सांगली) - वृक्षतोडीमुळे ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण होत आहे. वृक्षलागवड अन् संवर्धन करताना वटपौर्णिमेला असलेले कोरोनाचे संकट ओळखून मुक्तांगण प्ले स्कूल तर्फे शंभर वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलांनी वडाच्या झाडाजवळ गर्दी न करता आपल्या घरातच वडाच्या रोपाची पूजा करावी. वाटप केलेल्या रोपाचे योग्य संगोपन करून वृक्षलागवडीसाठी प्रयत्न करावेत. वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत चालला आहे. कोरोना काळात कित्येक रुग्णांचा “ऑक्सिजन” अभावी जीव गेला आहे. वडाच्या रोपाचे संगोपन करण्याचे आवाहन मुक्तांगणच्या संचालिका वर्षाराणी मोहिते यांनी केले आहे.
सौ. मोहिते म्हणाल्या,"वटपौर्णिमेचे औचित्य साधून आम्ही महिला पोलीस अधिकारी, काही महिला मंडळे, भिशी ग्रुप, महिला संघटनांच्या महिला प्रतिनिधींना ५० वडाची झाडे भेट दिली आहेत. या संस्थेच्या माध्यमातून निसर्गाच्या सानिध्यात ही झाडे लावली जाणार आहे. महिला पोलीस अधिकारी या पोलीस कवायत मैदानाच्या कडेला झाडे लावून संगोपन करणार आहेत. तर उर्वरित ५० झाडे व्यक्तीगत पातळीवर महिलांना दिली आहेत. या महिला वटपौर्णिमेनिम्मित रोपांचे पूजन करतील आणि हे झाड योग्य जागेत लावतील."
साक्षी ग्रुप, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, पोलीस मित्र महिला संघटना, जायंट्स ग्रुप ऑफ सहेली इस्लामपूर यांना झाडे देण्यात आली. बांधकाम सभापती सुनीता सपकाळ, संगीता शहा, चारुशीला फल्ले, पुष्पलता खरात, प्रतिभा पाटील, सुनीता काळे, शांता खोत,शुभांगी पवार उपस्थित होत्या. सरोजनी मोहिते यांनी स्वागत केले.
बांधकाम सभापती सुनीता सपकाळ म्हणाल्या," पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावली पाहिजेत.वटपौर्णिमेचा निमित्ताने मिळलेली भेट अनेक पिढ्यांना ऑक्सिजन देईल. रोझा किणीकर म्हणाल्या," सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाड हे वडाचे आहे. वटपौर्णिमेचा सण साजरा करताना आमच्या संघटनेच्या माध्यमातून झाडे लावून जगवण्यासाठी प्रयत्न करू." साक्षी ग्रुपच्या मीरा शिंदे म्हणाल्या, कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्व लोकांना समजले आहे. ऑक्सिजनच्या वृद्धीसाठी वड, लिंब , पिंपळ यासारख्या वृक्षांचे रोपण होणे ही काळाची गरज आहे. वडाच्या झाडांचे रोपण करण्याचा संकल्प आम्ही साक्षी ग्रुप तर्फे हाती घेत आहे. महिला पोलीस कर्मचारी सौ.पल्लवी माळी म्हणाल्या," वटपौर्णिमेचा सण साजरा होत असताना आम्हाला मुक्तांगण कडून झाड भेट मिळाले याचे संगोपन करू."
२१ हजार सीड बॉल यांची केली लागवड
पर्यावरण जागृती व संवर्धनासाठी "मुक्तांगण" वेगवेगळे उपक्रम घेत असते. पाच वर्षात २१ हजार सीड बॉल निसर्गाच्या कुशीत टाकण्यात आले आहेत. वटपौर्णिमेनिम्मित शंभर वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.वडाचे झाड अत्यंत आरोग्यदायी आहे. वडाच्या झाडाला पर्यावरणात महत्त्वाचे स्थान असून, प्राणवायू देणाऱ्या या झाडाचे उपस्थित महिलांना महत्व पटवून देत झाडांचे वाटप करण्यात आले.