रत्नागिरी - माथेफिरु तरुणाने सात जणांवर कोयत्याने वार केल्याची घटना लांजा तालुक्यातील देवधे गुरववाडीत घडली आहे. बुधवारी 11.30च्या सुमारास घडलेल्या या घटनेत पाच वर्षाच्या चिमुकल्यासह सात जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रमोद यशवंत गुरव (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने पाच वर्षीय आयुष गुरवसह अस्मिता गुरव (वय ३४), भास्कर पाटकर (वय ५३), शुभांगी पाटकर (वय ५२) अक्षता गुरव (वय २४), आयुष गुरव (वय ५), सुलोचना गुरव (वय ६१) अशा सात जणांच्या मानेवर, हातावर तसेच डोक्यात कोयत्याने वार केले. यापैकी एक वयोवृद्ध महिला आरडाओरडा करत घराबाहेर आल्याने वाडीतील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र माथेफिरुने पळ काढला. दरम्यान, आरोपीने तासाभराने लांजा पोलीस ठाण्यात हजर होऊन स्वतःहून गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने हल्ल्यामागचे कारण अद्यापही संगितलेले नाही.
हेही वाचा - पत्नीचा खून करून केला अपघाताचा बनाव, 24 तासात पती ताब्यात
दरम्यान, जखमी झालेल्या सातही जणांची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारांसाठी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. ज्यांच्यावर हल्ला झाला ते आरोपीचे नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.