रत्नागिरी - एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहानग्या मुलींसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजापूर तालुक्यातील रायपाटण खाडेवाडीत घडली. गणेशोत्सव सणाला अवघे दोन दिवस उरलेले असतानाच अशी धक्कादायक घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या महिलेने आपल्या सहा व तीन वर्षाच्या दोन्ही मुलींना ओढणीने गळफास लावून नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुहासिनी सुभाष सावंत असे आत्महत्या केलेल्या 40 वर्षीय महिलेचे नाव आहे. तर जान्हवी सुभाष सावंत ( वय 6) व मनस्वी सुभाष सावंत (वय 3 ) अशी त्या दोन लहानग्या दुर्दैवी मुलींची नावे आहेत. या घटनेमुळे रायपाटण गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष महादेव सावंत हे आपली पत्नी सुहासिनी, जान्हवी व मनस्वी या दोन मुलींसह आईवडील व भाऊ असे सात जणांचे कुटुंब रायपाटण खाडेवाडी येथे राहते. काल(बुधवार) सायंकाळी सुभाष व त्याचा भाऊ शेतावर गेले होते. तर सासू सासरेही बाहेर गेले होते. सुहासिनी ही दोन मुलांसह एकटीच घरात होती. सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान सुभाष आणि भाऊ घरी आले असताना घराचा मुख्य दरवाजा आतून कोयंडा लावून बंद असलेला दिसला. त्यावेळी सुभाष यांनी पत्नीला आवाज दिला असता आतून काहीच प्रतिसात मिळाला नाही. त्यांनी भावाला मागच्या दरवाजाने जाण्यास सांगितले, मात्र मागचा दरवाजाही बंद होता. त्यामुळे मग सुभाष यांनी घराचा मुख्य दरवाजा बाहेरून कोयंडा काढून उघडून आत प्रवेश केला व आतील खोलीत गेले. त्यावेळी पत्नी व दोन्ही मुली मृतावस्थेत आढळून आली.
पत्नी व मुलाना मृतावस्थेत पाहून हादरून गेलेल्या सुभाष व त्यांच्या भावाने आराडाओरड केली. यावेळी आजुबाजूच्या ग्रामस्थांनी सावंत यांच्या घराकडे धाव घेतली. याबाबत रायपाटणचे पाटील मनोज गांगण यांनी यांनी तात्काळ रायपाटण पोलीस दुरक्षेत्रामध्ये माहिती दिली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रायपाटण दुरक्षेत्राचे प्रमुख हितेंद्र चव्हाण यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी देखील राजापूरातुन आपल्या सहकाऱ्यांसह रायपाटण येथे घटनास्थळी आले. अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झालेले नाही.