रत्नागिरी - लांजा तालुक्यातील पन्हाळे धरणातून पाण्याची गळती होत असल्याने, परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. सोमवारी रात्री पन्हाळे धरणाच्या सांडव्यातून गळती सुरू असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. सांडव्यातून चिखलयुक्त पाणी वाहत असल्याचे ग्रामस्थांनी पंचायत समिती सदस्य अनिल कसबले यांना सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन,रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी एस. व्ही. नलावडे आणि कनिष्ठ अभियंता मंगेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
दरम्यान खबरदारी म्हणून धरणातून काही प्रमाणात पाण्याच्या विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे. धरणाच्या गळतीमुळे ग्रामस्थांमध्ये भिती निर्माण झाली आहे. गळती होत असल्याची वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.