रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प विरोधी आंदोलन अद्यापही तीव्र असल्याचं ग्रामस्थांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. बारसु-सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शनिवारी सरकारचे श्राद्ध घालत आपला रोष व्यक्त केला. प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात दि. 25 एपिल पासून बारसू येथील सड्यावर माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले. माती परीक्षणाला सुरूवात झाल्यापासून गोवळ, शिवणे, धोपेश्वर परिसरातील ग्रामस्थांनी या कामाला विरोध दर्शविण्यास सुरूवात केली. अगदी पहिल्या दिवसापासून मोठ्या संख्येने आंदोलक माती परीक्षण सुरू असलेल्या सड्यावर जमा झाले होते. मात्र प्रशासनाने या परिसरात मनाई आदेश जारी करताना या आदेशाचा भंग करणाऱ्यावर कारवाईची मोहीम हाती घेतली. तसेच माती परीक्षण सुरू असलेल्या ठिकाणापासून एक किलोमीटरच्या परीसरात पोलीस बंदोबस्त तैनात करून आंदोलकांची कोंडी केली होती.
पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष : एक दिवस आंदोलकांनी पोलिसांना हुलकावणी देत आत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्षही झाल्याचे पहायला मिळाले. एकीकडे प्रकल्प विरोधकांचे आंदोलन सुरू असताना दुसऱ्या बाजुला प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात माती परीक्षणासाठी ड्रीलींगचे कामही पूर्ण केले. ड्रीलींगचे काम पूर्ण झाल्यानंतर बारसू सड्यासह अन्य ठिकाणी तैनात करण्यात आलेला पोलीस बंदोबस्तही हटविण्यात आला. त्यामुळे रिफायनरी विरोधी आंदोलनही शांत झाल्याचे दिसत होते.
रिफायनरी होऊ देणार नाही : शनिवारी बारसु-सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्र येत ज्या ठिकाणी माती परीक्षणासाठी बोअर खोदण्यात आली होती. त्या बोअर जवळ सरकारचे पिंडदान केले. यावेळी सरकारच्या नावाने बोंबा मारण्यात आल्या. तसेच काही ग्रामस्थांनी आपले मुंडन करून सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. माती परीक्षण झालं म्हणजे रिफायनरी झाली असं शासनाला वाटत आहे. मात्र, सरकारने भ्रमात राहू नये, कारण आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत, तोपर्यंत रिफायनरी होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
हेही वाचा -