रत्नागिरी - लांजा तालुक्यात गोळवशी रस्त्याच्या कडेला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बेपत्ता फातिमा हमीद काळसेकर, यांचा हा मृतदेह असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
साटवली येथील मोहसीन हमीद काळसेकर याची आई फातिमा हमीद काळसेकर (६१) या मंगळवारपासून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी साटवली रोडवर गुरूवारी मोहसीन आणि त्याचा मोठा भाऊ दुचाकीवरून जात होते. यावेळी लघुशंका करण्यासाठी गोळवशी डंग येथे रस्त्याच्या साईटला मोहसीन गेल्यानंतर त्याला काही तरी जळाल्यासारखे दिसून आले. त्याने पुढे जावून पाहिले असता त्याला कुणाचा तरी जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. यानंतर त्याने सरळ पोलीस ठाणे गाठले आणि याबाबतची माहिती दिली.
घटनेबाबत माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, श्रीकांत जाधव, दिलीप पवार, तृप्ती सावंत-देसाई, नितीन पवार, आर. जे. वळवी आणि चालक राजेंद्र देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी रत्नागिरी येथील फिरते वैद्यकीय तपासणी पथकाला घटनास्थळी पाचारण केले आहे.
साटवली रोडवर गोळवशी ढंग येथे अनोळखी व्यक्तीला प्रथम ठार मारून नंतर त्याचा मृतदेह येथे आणून जाळण्यात आला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, लांजा पोलिसांच्या बेपत्ता रजिस्टरमध्ये फातिमा हमीद काळसेकर या बेपत्ता असल्याने त्यांचा हा मृतदेह असावा, असा अंदाज वर्तवला आहे. फिरते वैद्यकीय तपासणी पथक जोपर्यंत येऊन आपला अहवाल देत नाही तोपर्यंत हा कुणाचा मृतदेह आहे, सांगणे कठीण आहे. मात्र पोलिसांनी खुन्याचा गुन्हा असल्याने तपासाचे चक्र फिरवले आहे.