रत्नागिरी - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड येथील मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके हे दाऊद इब्राहिमचे गाव आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई येथील दाऊदच्या बहिणीच्या फ्लॅटचा 1 कोटी 80 लाख रूपयांना लिलाव झाला होता. त्यातच आता दाऊदच्या मुंबईसह खेड येथील मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे. अँटी स्मगलिंग एजन्सीद्वारे हा लिलाव केला जाणार आहे.
दाऊदच्या खेड येथील तीन मालमत्तांमध्ये एक तीन मजली बंगला आहे. दाऊद या बंगल्यात अनेक वेळा येऊन राहत असल्याचे बोलले जाते. या मालमत्तांमध्ये एक पेट्रोलपंपासोबत एक फ्लॅटदेखील आहे. पुण्यातील मुल्यनिर्धारण अधिकाऱ्यांना या मालमत्तांची किंमत ठरवण्यास अँटी स्मगलिंग एजन्सीने सांगितले आहे. खेडमधील मुख्य मालमत्ता ही दाऊदची बहीण हसीनाच्या नावे आहे. तर इतर मालमत्ता दाऊदची आई अमीना बीच्या नावे आहे.
दाऊद आणि त्याचे कुटूंबीय 1980 च्या दशकात खेडच्या बंगल्यात यायचे असेही बोलले जाते. मात्र 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर हा बंगला ओस पडला आहे. सध्या या घराची अवस्था खंदकाप्रमाणे आहे. गेली अनेक वर्ष पडून असलेल्या या घराभोवती मोठमोठाली झाडं वाढली आहेत. तीन मजली टोले जंग असलेली ही इमारत कधीही कोसळेल अशा अवस्थेत आहे.
विविध गुन्ह्यांमध्ये दाऊदचा हात असल्याच्या संशयावरून दाऊदचे मुंबके येथील राहते घरदेखील 38 वर्षांपूर्वी सरकारने ‘सील’ केले आहे. या इमारतीमध्ये काही वर्षापुर्वी अनोळखी, तसेच संशयास्पद व्यक्तींचा वावर होत असल्याने पोलिसांनीही या घराकडे गस्त सुरू केली होती. याबाबत सावधगिरी बाळगण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. दाऊदचा हा बंगला सेल्फी पॉईंट सुद्धा बनत चालला होता. पण आता या सर्व मालमत्तांवर टाच येणार आहे.