रत्नागिरी - आरोप करणाऱ्या विरोधकांना आणखी 25 वर्ष विरोधक म्हणून राहावे लागेल, असा टोला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपला लगावला. ते आज रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
विरोधकांना आणखी २५ वर्ष विरोधक म्हणून रहावे लागेल -
येत्या आठ दिवसात आणखी एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल असे भाकित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केले होते. याबाबत बोलताना उदय सामंत यांनी मिश्किल टिपण्णी केली आहे. सामंत म्हणाले की, अकरा महिन्यात सरकार जाणार असे विरोधक सांगत होते. मात्र, सरकार काही गेले नाही. सरकार पाच वर्ष टिकणार असून जे विरोधक आरोप प्रत्यारोप करत आहेत, त्यांना आणखी २५ वर्ष विरोधक म्हणून रहावे लागेल, असा टोला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.
तरी उद्धव साहेब ठाकरे यांच्या प्रतिमेवर काडीमात्रही फरक होणार नाही -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जाते आहे. याबाबत बोलताना सामंत म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कोणीही कितीही आरोप केले, तरी त्याचा काडीमात्रही फरक उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेवर होणार नाही. या शब्दात त्यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. सामंत पुढे म्हणाले की, ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या हृदयामध्ये बसायला लागली, त्यावेळेपासूनच विरोधकांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केले आहे. मला असे वाटते की उद्धव ठाकरेंना टार्गेट केले म्हणजे त्यांची महाराष्ट्राच्या जनतेतील प्रतिमा मलिन होईल. मात्र, असा कोणाचा गैरसमज असेल, तर तो चुकीचा आहे. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र घरातील व्यक्ती मानतो, त्यामुळे कोणीही कितीही आरोप केले तरी त्याचा काडीमात्रही फरक उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेवर होणार नाही.