रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण २००० सालात पुर्ण झाले. मात्र, त्यानंतर काही वर्षांतच या धरणाला गळती लागली. किरकोळ दुरुस्ती वगळता या धरणाची गळती कधी काढली गेली नाही. तिवरे धरण हे गळती लागल्याने फुटल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केला आहे. तिवरे धरण फुटल्याने जवळपास २३ जण वाहून गेले होते. त्यापैकी ८ मृतदेह हाती लागले आहेत.
या धरणात केवळ २८ टक्के पाणीसाठा होता. पण २८ टक्के पाणीसाठा असलेले धरण रात्री क्षणात फुटले. पाटबंधारे खात्याने या धरणाच्या गळतीकडे वेळीच लक्ष्य दिले असते तर, हा धोका टाळता आला असता. धरण फुटल्यानंतर आता हे धरण पुर्ण रिकामे झाले आहे. हजारो क्युसेक्स पाण्याने भेंडेवाडीतल्या संसारांची राखरांगोळी केली.
चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील लघुपाटबंधारे विभागाचे तिवरे धरण मंगळवारी रात्री फुटले. मात्र, या दुर्घटनेनंतर इथल्या खुणासुद्धा पुसून गेल्या आहेत. या ठिकाणी एक गणपतीचे मंदिर होते. मात्र, त्याची एकही खून जाग्यावर नाही. इथली घरे वाहून गेली आहेत. तिवरे धरण फुटल्यानंतर काही क्षणात भेंडेवाडी होत्याची नव्हती झाली. धरण फुटल्यानंतर इथली परिस्थिती क्षणार्धात कशी बदलली हे गावातील लोकांकडून जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी.