रत्नागिरी - रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे नातुंडेवाडी येथे चिरे (विट) वाहतूक करणारा टेम्पो उलटून अपघात झाला. या अपघातात ट्रकमधील 3 कामगारांचा विटा अंगावर पडल्याने मृत्यू झाला. तर गाडी मालकासह चारजण गंभीर जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. शुक्रवारी (दि. 20 डिसें) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
मृत कामगारांमध्ये अजय अनंत लाखण, सुधाकर कृष्णा लाखण या सख्ख्या चुलत भावांसह गोरक्ष काळे (सर्व रा. शिवार आंबेरे) या यांचा समावेश आहे. तर ओमकार विश्वनाथ खानविलकर, सूर्यकांत गोविंद पाजवे, यशवंत गोसावी, दिलीप नमसले हे चौघे जखमी झाले आहेत.
पावस नजिकच्या मावळंगे नातुंडेवाडी येथून विश्वनाथ खानविलकर यांच्या मालकीच्या टेम्पोमधून विटा भरुन ते मोरया सडा येथे जात होते. यावेळी मार्गावर नातुंडेवाडी जवळ वळणावर चिरे घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आंब्याच्या झाडाची फांदी लागली. झाडाच्या फांदीच्या धडकेने टेम्पो रस्त्यावरून खाली उतरला आणि यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो एकाबाजूला उलटला. त्यानंतर गाडी रस्त्याच्या खाली कोसळली.
टेम्पोमध्ये एकुण सातजण होते. ट्रकच्या हौद्यामध्ये काही कामगार बसले होते. टेम्पो उलटल्याने टेम्पोच्या हौद्यात विटांवर बसलेल्या तिघा कामगारांच्या अंगावरच विटा कोसळल्या. या तीघांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहे. यातील सूर्यकांत पाजवे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - ‘स्लोपिंग ट्रॅक’ आणि ‘रोलर’चा वापर करून वीज निर्मिती!
अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. ग्रामस्थांनी आपल्या गाड्यांमधून जखमींना रुग्णालयापर्यंत पोहचविले. अपघाताचे वृत्त शिवार आंबेरे परिसरात पोहचताच गावातील ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. ट्रक नेमका कोण चालवत होते हे स्पष्ट झाले नव्हते. पुर्णगड पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी जावून पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
हेही वाचा - डिझेलच्या तुटवड्यामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडले