रत्नागिरी- जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील आडिवरे गावच्या महाकाली देवीचा नवरात्रौत्सव हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी या उत्सवावर कोरोनाचं सावट आहे. धार्मिक विधी वगळता भाविकांसाठी मंदिर बंदच आहे. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीप्रमाणे महाकाली देवीला प्रतिमहाकाली म्हणून ओळखलं जातं. तसं पाहिलं तर कोकणातील नवरात्रौत्सवातील सर्वात मोठी जत्रा देखील याच ठिकाणी भरते.
पण, यंदा मात्र या ठिकाणी शुकशुकाट पाहायाला मिळत आहे. मंदिराला देखील टाळं असून भाविक बाहेरूनच दर्शन घेऊन जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या देवस्थानाची किर्ती देखील दूरदूर पसरलेली असून अगदी पश्चिम महाराष्ट्रातून देखील या ठिकाणी भाविक दरवर्षी नवरात्रौत्सवाच्या काळात येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या ठिकाणी धार्मिक विधी तसेच देवीचा उत्सव काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. अशी घटना किमान देवस्थानाच्या इतिहासात तरी पहिल्यांदाच घडत आहे.
मंदिराची रचना
हे मंदिर पुरातन असून, श्री महाकाली मूर्ती दक्षिणमुखी आहे. या मूर्तीच्या शेजारी श्री योगेश्वरीची देखील मूर्ती आहे. महाकाली देवीच्या समोर श्री महालक्ष्मीचे मंदिर असून, डाव्या बाजूला श्री महासरस्वतीचे मंदिर आहे. या देवीच्या दर्शनाला आले असता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात गेल्याचे जाणवते. या मंदिराची रचनादेखील तशाच प्रकारची आहे. श्री योगेश्वरी, श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती व श्री रवळनाथ हे पंचायतन येथे पाहावयास मिळते. श्री महाकाली मंदिरामध्ये सभामंडपातील लाकडी खांबावर गणपती, मृदंगी, द्वारात चतुर्भुज द्वारपाल जय-विजय अशा मूर्ती प्राचीन कारागिरांनी कोरलेल्या आहेत. श्रींपुढे सभामंडपात छताला अनेक चित्रे लाकडाच्या पाटावर कोरलेली आहेत.