रत्नागिरी - जिल्ह्यात लंडनवरून दहा जण आले असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मागील दहा दिवसांत हे दहा जण जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांच्या नावांची यादी आरोग्य यंत्रणेला विमानतळ प्रशासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती आहे.
दहापैकी सातजण हे रत्नागिरी तालुक्यातील -
या दहाही जणांचा शोध आरोग्य यंत्रणेने घेतला असून यापैकी सात जण हे रत्नागिरी तालुक्यातील, तर तीन जण हे संगमेश्वर तालुक्यातील आहेत. रत्नागिरी तालुक्यातील सात जणांपैकी एकजण मद्रास येथे, तर दुसरा रायगड येथे गेला आहे. उरलेले पाच जण रत्नागिरी शहरातील असून सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची कोरोना टेस्ट करून त्यांना एमआयडीसी येथील विलगिकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या नवा प्रकारामुळे भीतीचे वातावरण -
काही दिवस आधी ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला होता. कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असताना इंग्लंडमधील कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे जगभर भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा हा नवीन विषाणू आऊट ऑफ कंट्रोल असल्याचे ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनी तेथील संसदेत सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर लंडनवरून दहा जण रत्नागिरी जिल्ह्यात आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
हेही वाचा - सरकारचे शेतकरी संघटनांना पत्र; एमएसपीवर लेखी आश्वासन देण्यास तयार