रत्नागिरी - समुद्रकिनारी गाडी नेणं पर्यटकांना चांगलंच महागात पडलं आहे. दापोली तालुक्यातील आडे येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी आपली गाडी समुद्रकिनारी उभी करून ठेवली होती. मात्र, पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये भरतीचे पाणी शिरल्याने तिचे नुकसान झाले. त्यानंतर ही गाडी काढण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - आज मंत्रिमंडळाचा विस्तार, राष्ट्रवादीच्या 'या' पाच नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब
पुणे येथील पर्यटक पर्यटनासाठी टेम्पो ट्रॅव्हलरने (क्र. एमएच.12.क्यूडब्लू.0904) आडे येथे आले होते, हे पर्यटक पोहण्यासाठी समुद्रात गेले होते, तर चालकाने गाडी समुद्रकिनारी वाळूत उभी केली होती. गाडी लावली तेव्हा ओहोटी होती. मात्र, समुद्राला भरती लागली तेव्हा त्या गाडीवर लाटा आदळू लागल्या व सदर टेम्पो ट्रॅव्हलर पाण्यात वाहून जाऊ लागली. ही बातमी गावात समजल्यावर ग्रामस्थ धाऊन आले. त्यानंतर ही ट्रॅव्हलर काढण्यासाठी जेसीबी बोलावण्यात आला व जेसीबीला दोऱ्या बांधून ही टेम्पो ट्रॅव्हलर बाहेर काढण्यात आली. मात्र, या सर्व प्रकारात टेम्पो ट्रॅव्हलरचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील सर्वच समुद्रकिनारी गाड्या नेऊ नका, असे ग्रामस्थ पर्यटकांना नेहमी सांगतात. तरीही ग्रामस्थांचे न ऐकताच पर्यटक गाड्या समुद्रकिनारी घेऊन जातात व अनेक वेळी या गाड्यांचे नुकसान होते.