रत्नागिरी - राज्यसभेच्या काही जागांवर यंदा निवडणूक होणार आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे नवे समीकरण जुळून आल्यानंतर एनडीएचे (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) पारडे हलके झाले आहे. त्यातचा आता राज्यामध्ये भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल, याची चर्चा सुरू आहे. बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणारे संजय काकडे यांना गेल्यावेळी भाजपने राज्यसभेवर बोलावले. मात्र, यावेळी त्यांच्या नावाची चर्चा मागे पडली आहे. भाजपने वाचाळविरांवर पायबंद घालण्यासाठी काकडे यांचे तिकीट कापले असल्याचे राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे यांनी टोला लगावला आहे तर शिवसेनेने सुद्धा टीका करायची संधी सोडलेली नाही.
हेही वाचा -अरविंद सावंतांचे अखेर पुनर्वसन; महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीचे अध्यक्ष
संजय काकडे यांचे राज्यसभेचे तिकीट कापण्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेने काकडेंवर खोचक टीका केली आहे. तटकरे म्हणाले, "संजय काकडे यांच्या गेल्या काही वर्षातील वक्तव्यावरुन भाजपला नुकसान झाले आहे. त्यांना भाजपने अधिकार दिलेले नसताना कोणत्याही मुद्द्यावर प्रतिक्रिया दिल्या. तसेच उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेण्यावरुन काकडे यांचे तिकीट कापले असावे." तसेच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले, "जोपर्यंत आहे तोपर्यंत वापरून घ्या, त्यानंतर फेकून द्या या उक्तीनुसार भाजपने संजय काकडेंचे तिकीट कापलेले असावे."
हेही वाचा - 'राज्यात घडणाऱ्या घटनांचा तपास महाराष्ट्र पोलिसांनीच करायला हवा'